या प्रसंगी आ. दिलीपरावजी देशमुख म्हणाले…. डॉ. लहानेसाहेब आपण रुग्णांना देव मानून सेवा करीत आहात, अत्यंत लहान वयात आपण सन्मार्गावर चालत आहात. किती कौतुक करावं आपलं, त्यापेक्षा आम्हाला आपला एखादा गुण घेता आला तर आमच्यापेक्षा भाग्यवान आम्हीच. या शिवारात अनेक प्रकारची झाडे आहेत पण तुम्ही लावलेलं (डॉ. लहाने यांच्या आई-वडिलांना उद्देशून) हे चंदनाचं झाड सर्वांना सुगंध देत आहे हे एक पुण्याचं काम तुमच्या हातून, तुमच्या कुटुंबात घडलं आहे. अशा या चांगल्या टीमच्या पाठीमागे उभा राहण्यास मला आत्मिक आनंद मिळेल. डॉ. लहाने तुम्ही लावलेल्या या दिव्याला तेल कमी पडणार नाही एवढीच ग्वाही देतो. या प्रसंगी डॉ. डावर सर म्हणाले…. “डॉ. विठ्ठल लहाने गरीब व गरजूंना मदत करत आहेत. त्यांचा पुनर्जन्म डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हातून होत आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत.” डॉ. रुग्ण व पालकांसमवेत मा. आ. दिलीपरावजी देशमुख, मा. बी. एम. डावर, डॉ. ए. बी. सोलपुरे, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. लहाने यांचे आई-वडील, डॉ. सौ. कल्पना लहाने, डॉ. राजेश शाह, सौ. कल्पना शाह व उपस्थित रुग्ण – त्यांचे पालक